Career switching an easily acceptable option

करिअर स्विचिंग – एक सहज स्वीकार्य पर्याय

मी यापूर्वी लिहिलेल्या “लेखाकार ते अनुवादक एक अनपेक्षित व्यावसायिक प्रवास…!” या ब्लॉगला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार! हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेक जणांना माझा व्यावसायिक प्रवास प्रथमच जवळून समजला आणि नंतर अनेकांनी माझ्या या “करिअर-स्विचिंग” विषयी फार कुतुहलाने विचारणा केली. कालांतराने हाच धागा पकडून काही सकारात्मक विचार मांडावे का, असे मनापासून वाटले आणि जमेल तस-तसे काही विचार लिहायला सुरुवात केली.

आजकाल बहुतांशी ठिकाणी असे दिसून येते की ज्या फॅकल्टीमधून आपले ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे साधारण त्याच विभागाशी संबंधितच जॉब हवा, असा आग्रह तरुण पिढीकडून धरला जातो. खरेतर त्यामध्ये चुकीचे असे काहीच नाही, कारण आत्तापर्यंत घेतलेल्या शिक्षणावर आपण बराच पैसा खर्च केलेला असतो. उदाहरणार्थ कॉमर्स ग्रॅज्युएटला अकाउंट्सशी संबंधित जॉब हवा असतो, सिव्हील इंजिनिअररिंग केलेल्या व्यक्तीला बांधकाम व्यवसायाशी संबंधित जॉब हवा असतो इत्यादी. पण आजच्या पिढीने आपण काय शिकलो यापेक्षा नोकरीच्या क्षेत्रामधील “latest market requirements” काय आहेत आणि या आवश्यकता आपण आजवर घेतलेल्या शिक्षणाला कशाप्रकारे सुसंगत असू शकतील याचा देखील तितकाच सखोल आणि सकारात्मक विचार करून त्याचा स्वतःच्या कौशल्य विकासासाठी फायदा करून घेणे फार गरजेचे आहे असे मनापासून वाटते. आपण एक आणि एकच गोष्ट मनामध्ये धरून बसलो तर परिणामी उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींपैकी एखादी उत्तम संधी अनावधानाने हातातून निसटून जाण्याची शक्यता आजच्या बदलत्या काळात नक्कीच नाकारता येत नाही.

अगदी अलीकडेच माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या कंपनीमधील एका सीनियर पोस्टवरच्या सरांचा त्यांना इंटरव्ह्यु दरम्यान आलेला एक अनुभव तिने मला सांगितला. सोशल मीडियावर बऱ्याच काळापूर्वी कंपनीने पोस्ट केलेली जाहिरात वाचून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषा उत्तम जाणणारा तसेच कम्प्युटर इंजिनिअरिंग (BE Computer) झालेला एक स्मार्ट कॅन्डीडेट चौकशीसाठी आला होता. जाहिरात तशी जुनी होती पण तरी त्याचा CV पाहून सरांनी त्याला आत बोलावले. त्याला अपेक्षित असलेल्या IT विभागामध्ये त्या दरम्यान रिसोर्सची तत्काळ अशी गरज नव्हती. इंटरव्ह्यु उत्तम झाला, पण सरांनी त्याला तूर्तास ट्रान्सलेशन डिपार्टमेंटमध्ये जॉइन होण्याबद्दल विचारणा केली तसेच IT विभागामध्ये योग्य ती संधी उपलब्ध झाल्यावर तुला लगेचच त्या डिपार्टमेंटमध्ये स्विच करू असे आश्वासन देखील दिले पण त्या स्मार्ट कॅन्डीडेटने क्षणार्धात “Sorry sir, I am not interested in this profile” असे उत्तर देऊन तो तडक केबिनमधून बाहेर पडला. नंतर साधारण महिन्याभरामध्येच त्यांच्या ट्रान्सलेशन डिपार्टमेंटमधून जर्मन आणि थोडेफार बेसिक IT अशा दोन्ही डोमेनमधले ज्ञान असलेल्या एक-दोन जणांना Developer Support करिता एका शॉर्ट टर्म प्रोजेक्टसाठी जर्मनीमधील एका नामांकित कंपनीमध्ये पाठविण्यात आले. “हा मुलगा जॉईन झाला असता तर या प्रोजेक्टसाठी नक्कीच सिलेक्ट झाला असता” अशी हळहळ त्या सरांनीच व्यक्त केली कारण इंटरव्ह्यु फ्रेशर म्हणून जरी झाला होता तरी तो extra ordinary कॅन्डीडेट होता, असे त्याने इंटरव्ह्यु दरम्यान दिलेल्या उत्तरांमधून जाणवले होते. आता हा प्रसंग वाचून वाचकहो तुम्हीच सांगा, की आजच्या काळात आपण आपल्या जॉब विषयी ठरविलेल्या तत्त्वांमध्ये काहीशी शिथिलता (flexibility) ठेवणे किती गरजेचे आहे? उपरोक्त उदाहरणावरून हे नक्कीच समजते की हा फ्रेशर कॅन्डीडेट थोडाफार सारासार विचार करून त्या कंपनीमध्ये तूर्तास जॉईन झाला असता तर त्याला त्याच्या पहिल्याच कंपनीतर्फे डायरेक्ट ऑनसाईट जाण्याची संधी अगदी कमी काळातच मिळाली असती आणि मुख्य म्हणजे नवीन खूप काही शिकायलाही मिळाले असते.

वर्षभरापूर्वी माझ्या भाच्याला एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉलसेंटरकडून कॉल आला, कोरोनामुळे घरचे आर्थिक गणित थोडे गडबडले होते म्हणून तो त्याने स्वीकारावा असे आम्हा सर्वांनाच वाटत होते, त्याला याविषयी विचारणा करताना मला त्याने सरळसोट उत्तर दिले “ मावशी, मी ENTC मध्ये इंजिनियरिंग केले आहे, मग मी कॉलसेंटरचा “लो प्रोफाइल” जॉब का स्वीकारू?” मला जाणवले की याचा जरा ब्रेनवॉश करायलाच हवा. खूप समजावल्यावर साहेब तयार झाले आणि कामावर रुजू झाले. वर्षभर त्याचे काम पाहून आणि नेटवर्क कनेक्शन्ससारख्या काही किरकोळ टेक्निकल अडचणी आल्यावर त्याने शिताफीने त्यावर सुचविलेले उपाय यशस्वी झाल्याचे पाहून कंपनीने त्याची लगेचच काही महिन्यांमधे IoT डिपार्टमेंटमध्ये नेमणूक केली, त्या बेताने पगारही चांगला वाढला. चार दिवसानी मला मुद्दामून भेटून म्हणाला “मावशी, तू म्हणतेस ते अगदी खरय गं, समोरून चालत आलेली संधी नाकारून आपण स्वतःचे किती नुकसान करतो हे आज लक्षात आलं, थँन्क्स! मला हा जॉब करायला “भाग पाडल्याबद्दल!”

ही आणि अशी अनेक असंख्य उदाहरणे जगामध्ये ठीक-ठिकाणी बघायला मिळतात. एखादा अकाउटंट सेल्समध्ये जायला तयार नसतो तर एखादा ग्राफिक डिझाइनर ऑफिस डमिन व्हायला तयार नसतो. अशा वेळी आपल्या आवश्यकतेनुसार आणि शैक्षणिक धरतीवरील नोकरीच्या टिपिकल ट्रेंडला धरून राहता समोरून चालत आलेली संधी स्वीकारण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे. जर काम देऊ पाहणाऱ्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही हे काम करू शकता असा विश्वास वाटतो, तर मग एका वेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची समोरून चालत आलेली संधी आपण का गमवावी? असा प्रश्न अशावेळी स्वतःला निदान एकदातरी विचारावा.

माझ्या स्वानुभवावरून मी नक्कीच असे म्हणेन की आजच्या धावत्या आणि बदलत्या युगामध्ये कोणत्याही कामाला कधीच कमी न लेखता प्रत्येकाने आहे त्या परिस्थितीमध्ये आजन्म शिकण्याची तयारी आणि प्रत्येक कामामध्ये उत्साह दाखवून समोर आलेल्या संधीचे सोने कसे करता येईल याचा विचार नक्कीच केला पाहिजे. आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये मल्टी-टास्किंग (#multi-tasking) आणि मल्टीपल स्कीलसेट्स (#multiple skillsets) चा विचार बहुतांशी कंपन्यांकडून केलेला दिसून येतो. कंपनीला एखाद्या व्यक्तीचा (रिसोर्स) जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले जाते. उदाहरणार्थ, माझ्या कंपनीमधील एका खुर्चीमध्ये बसलेली एखादी व्यक्ती 4 वेगवेगळया जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकत असेल तर मी चार जणांना पगार देण्यापेक्षा, ती चार कामे शिताफीने करू शकणाऱ्या त्या एकाच व्यक्तीला प्रथम प्राधान्य देईन. त्यामुळे अशा बदलत्या वर्किंग ट्रेंड्स आणि वर्किंग कल्चरचा विचार करून आपणही आपल्या पारंपरिक विचारधारेला छेद देऊन नोकरी/जॉब संदर्भातील आवश्यकता (requirements) आणि मागण्यांचा (demands) सारासार विचार करून करिअरच्या बाबतीत स्वतःचा दृष्टीकोन बदलणे किंवा बदलत राहणे गरजेचे आहे, असे मला मनापासून वाटते.

संपदा पाध्ये | फिडेल सॉफ्टेक

Ref. No – FB09221033

 

Contact Us